💥ग्राम महसूल अधिकारी सौ. नंदा शिंदे यांची मंडळ अधिकारी पदावर पदोन्नती💥
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
मंगळवार २४ फेब्रुवारी २०२६
श्रीगोंदा प्रतिनिधी – महसूल विभागात कर्तव्यदक्ष व प्रामाणिक कामगिरी करणाऱ्या सौ. नंदा शिवाजी शिंदे (सौ. नंदा सोमनाथ घोडके) यांची मंडळ अधिकारी पदावर पदोन्नती झाली असून त्यांची अंबाजोगाई येथील पाटोदा मंडळ येथे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ऑक्टोबर २०१५ मध्ये बीड जिल्हा येथील आष्टी तालुका येथे महसूल विभागाच्या सरळ सेवा भरती परीक्षेद्वारे त्यांची ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) म्हणून निवड झाली होती. महिलांचा स्पर्धा परीक्षांकडे कमी कल असलेल्या काळात त्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले.
नियुक्तीनंतर त्यांनी निमगाव चोभा व नांदा सज्जा येथे जबाबदारी सांभाळत तब्बल दहा वर्षे उत्कृष्ट सेवा बजावली. त्यानंतर प्रशासकीय बदलीत त्यांची पाटोदा तालुका येथील वहाली सज्जावर नियुक्ती झाली. दरम्यान १६ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर झालेल्या पदोन्नती यादीत त्यांचे नाव मंडळ अधिकारी म्हणून घोषित झाले.
सौ. नंदा शिंदे या हिरडगाव (ता. श्रीगोंदा) येथील प्रगतशील शेतकरी व प्रसिद्ध किराणा दुकानदार परमार्थ प्रेमी श्री. शिवाजी नाना धोंडीबा शिंदे यांच्या कन्या होत. शिक्षण आणि संस्कार यांचे बाळकडू त्यांना या घरातूनच मिळाले त्यांचा विवाह टाकळी लोणार येथील वारकरी रत्न ह.भ.प श्री बाळू काका महाराज घोडके यांचा मुलगा श्री. सोमनाथ बाळासाहेब घोडके यांच्याशी झाला असून ते भारतीय डाक विभाग अंतर्गत मुंबई आरएमएस येथे कार्यरत आहेत. पतीच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी पदोन्नतीसाठीच्या परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्या.
घर आणि नोकरीची जबाबदारी समर्थपणे पार पाडत, आजारी सासू-सासऱ्यांची सेवा आणि मुलांचे संगोपन करत त्यांनी आपल्या कर्तृत्वाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या यशामुळे माहेर आणि सासर या दोन्ही घराण्यांचा गौरव झाला आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज म्हणतात- तुका म्हणे ऐसे ते कवन एक जननी! दोन्ही कुळा ते साकाळीता!!
सौ. नंदा शिंदे यांच्या या संघर्षमय व प्रेरणादायी प्रवासाबद्दल श्रीगोंदा पंचक्रोशीत आनंद व्यक्त होत असून त्यांच्या भावी वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छा दिल्या जात आहेत.
मंज़िल उन्हीं को मिलती है,
जिनके सपनों में जान होती है!
सिर्फ पंखों से कुछ नहीं होता,
हौसलों से उड़ान होती है!
🔴🟢🟠🟣
