आष्टी महावितरणच्या निष्काळजी कारभारामुळे चार गावांचा वीजपुरवठा विस्कळीत
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
बुधवार २० मे २०२६
विश्व निर्माता जालना प्रतिनिधी : हरिचंद्र वाघमारे
परतूर तालुक्यातील रायगव्हाण, फुलवाडी, पळशी आणि आनंदगाव या गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वीजपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. आष्टी येथील महावितरण कार्यालयातील वरिष्ठ कर्मचारी आणि अभियंत्यांच्या निष्काळजीपणामुळे या चार गावांना एक दिवसाआड थ्री-फेज वीजपुरवठा दिला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कधी पार्ट जळणे, कधी जंप कट होणे, तर कधी अचानक लाईट बंद होणे अशा समस्या रोजच उद्भवत आहेत. शेतकऱ्यांना केवळ तीन ते चार तासच वीज मिळत असल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे.
शेतकरी महावितरण कार्यालयात गेल्यानंतर “लाईन टाकली आहे” असे सांगितले जाते, मात्र गावात परतल्यावर प्रत्यक्षात वीजपुरवठा बंदच असल्याचे दिसून येते. अधिकारी आणि कर्मचारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
सध्या तापमान ४० ते ४३ अंशांपर्यंत पोहोचले असून पिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे. या भागात केळी, ऊस, शेवगा, मोसंबी, लिंबू, आंबा आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. मात्र पुरेसे पाणी उपलब्ध असूनही विजेअभावी शेतकऱ्यांची पिके जळून जाण्याची वेळ आली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, जायकवाडीच्या डाव्या कालव्यामुळे या भागात लोडशेडिंगचा मोठा परिणाम होत आहे. आठवड्यातून केवळ तीन ते चार दिवसच व्यवस्थित वीज मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गावठाणाची लाईन गेल्या सात महिन्यांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांना सातत्याने त्रास सहन करावा लागत आहे.
वारा आला, वायर तुटली किंवा पाऊस पडला की तात्काळ वीजपुरवठा खंडित होतो. सिंगल फेज समस्येमुळे पावसाळा संपेपर्यंत नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. उन्हाळ्यात लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना मोठ्या प्रमाणात हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. घरातील कुलर आणि पंखे केवळ शोभेच्या वस्तू ठरत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
वीजपुरवठा सुरू असतानाही अनेकदा व्होल्टेज कमी असते. त्यामुळे जनरेटरचा वापर वाढला असून सामान्य नागरिकांच्या खर्चात भर पडत आहे. ग्राहकांकडून नियमित वीजबिल वसूल करूनही महावितरणकडून समाधानकारक सेवा मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या चारही गावांचा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना नियमित वीज द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
🟠🟣🔴🟢
