अन्न सुरक्षेबाबत FSSAIचा इशारा; खाद्यपदार्थ गुंडाळण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर तात्काळ बंद करा
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
7 जून 2026
भारत प्रतिनिधी : नाहीद गफ्फार पठाण
अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) ने खाद्यपदार्थ पॅकिंग, गुंडाळणे किंवा वाढण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर करू नये, असा कडक इशारा दिला आहे. वर्तमानपत्रांवरील शाई व रासायनिक घटक अन्नामध्ये मिसळून ग्राहकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे FSSAI ने स्पष्ट केले आहे.
FSSAI च्या पश्चिम विभागाने सर्व हॉटेल चालक, खाद्यपदार्थ विक्रेते, स्ट्रीट फूड विक्रेते तसेच अन्न व्यवसायिकांना तात्काळ वर्तमानपत्रांचा वापर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्नपदार्थांसाठी केवळ अन्न सुरक्षा नियमांनुसार मान्यताप्राप्त फूड-ग्रेड पॅकेजिंग साहित्यच वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईमध्ये अलीकडेच एका वडापाव विक्रेत्याकडून खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून दिले जात असल्याचे आढळून आले. या घटनेनंतर FSSAI आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांनी संयुक्त कारवाई केली. तसेच नागरिकांनी वर्तमानपत्रात गुंडाळलेले अथवा वाढलेले अन्नपदार्थ खरेदी टाळावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
FSSAI च्या मते, वर्तमानपत्रांच्या शाईमध्ये शिसे (Lead), जड धातू आणि इतर हानिकारक रसायने असू शकतात. गरम, तेलकट किंवा ओलसर अन्नपदार्थांच्या संपर्कात आल्यास ही रसायने अन्नामध्ये मिसळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे दीर्घकालीन आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
याशिवाय वर्तमानपत्रे अनेकदा अस्वच्छ ठिकाणी ठेवली जात असल्याने अन्न दूषित होण्याचा आणि अन्नजन्य आजारांचा धोका वाढतो. तपासणीदरम्यान भजी, वडापाव, समोसे आणि इतर खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून दिले जात असल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे सर्व खाद्य व्यवसायिकांनी सुरक्षित, स्वच्छ आणि फूड-ग्रेड पॅकेजिंग साहित्याचा वापर करावा, असे FSSAI ने स्पष्ट केले आहे.
🔵🟠🟡🔴
