*महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्सची भारतीय सैन्य दलात भरारी*
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
7 जून 2026
भारत प्रतिनिधी: नाहीद पठाण
देशसेवा, शिस्त, नेतृत्व आणि समर्पण यांचे प्रतीक असलेल्या राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी उल्लेखनीय कामगिरी रयत शिक्षण संस्थेच्या, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या चार कॅडेट्सनी केली आहे. एनसीसी विभागातील चार कॅडेट्सची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल व कबड्डी खेळाडू तुषार भोसले याची महाराष्ट्र पोलीस मध्ये निवड झाली. या निवडी मधील तीन कबड्डी खेळाडू आहेत. त्यांचा सत्कार समारंभ महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या सिनिअर अंडर ऑफिसर करण राणेरजपूत, ज्युनियर अंडर ऑफिसर स्वप्निल जामदार, कॅडेट अर्जुन धोत्रे आणि कॅडेट साहिल ससाणे यांचा गौरव महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. प्रकाश साळवे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. रावसाहेब काळे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. श्रीकांत थोरात तसेच पर्यवेक्षक रत्नाकर झिटे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे यांनी सांगितले की, “भारतीय सैन्य दलात सेवा करण्याची संधी ही केवळ नोकरी नसून राष्ट्रसेवेचे सर्वोच्च कर्तव्य आहे. एनसीसी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व, आत्मविश्वास, संघभावना आणि देशभक्तीची मूल्ये रुजवते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या यशस्वी कॅडेट्सचा आदर्श घेऊन आपल्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. कठोर परिश्रम, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर कोणतेही यश प्राप्त करता येते. आज या पाच विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे संपूर्ण महाविद्यालयासाठी प्रेरणादायी असून भविष्यात आणखी विद्यार्थी सैन्य, पोलीस, निमलष्करी दल तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवतील, असा विश्वास आहे.”
या वेळी महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन माजी आमदार बबनरावजी पाचपुते, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. बाबासाहेब भोस, माजी आ. राहुल जगताप, मा. महावीर पटवा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, उपप्राचार्य डॉ. सुदाम भुजबळ डॉ. नितीन थोरात, जिमखाना प्रमुख प्राध्यापक रमेश थोरात क्रीडा शिक्षक संजय डफळ आदींनी निवड झालेल्या कॅडेट्सचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या.
17 महाराष्ट्र बटालियन NCC अहिल्यानगर चे कमांडिंग ऑफिसर, कर्नल प्रसाद मिजार, ॲडमिन ऑफिसर, कर्नल निकेतसिंग नेगी यांनी निवड झालेल्या कॅडेट्सचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट अनुराधा शिंदे यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या शेवटी एनसीसी विभाग प्रमुख तथा CTO डॉ. किरण ढवळे यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, एनसीसी कॅडेट्स आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या या चार कॅडेट्सच्या व महाराष्ट्र पोलीस यांच्या यशामुळे महाविद्यालयाच्या एनसीसी व क्रीडा विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या यशाने इतर विद्यार्थ्यांनाही देशसेवेची प्रेरणा मिळाली आहे.
🔵🔴🟡🟠
