जनगणना 2027 : जन-जनाची गणना, राष्ट्राच्या प्रगतीचा पाया
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
बुधवार, 3 जून 2026
भारत प्रतिनिधी : नाहीद पठाण
भारतात जगातील सर्वात मोठ्या जनगणना-2027 अभियानाला सुरुवात झाली आहे. देशातील सर्वात मोठ्या प्रशासकीय आणि सांख्यिकीय उपक्रमांपैकी हा एक महत्त्वाचा उपक्रम मानला जात आहे. पूर्णपणे डिजिटल डेटा संकलनासह स्व-गणनेची सुविधा असलेली ही भारतातील पहिली जनगणना ठरणार आहे.
देशातील विविध कल्याणकारी योजना, निवडणूक मतदारसंघांची रचना आणि विकास योजनांचे नियोजन हे जनगणनेतून मिळणाऱ्या आकडेवारीवर आधारित असते. त्यामुळे जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्याची प्रक्रिया नसून देशाच्या विकासाचा पाया मानली जाते.
यंदाच्या जनगणनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्वातंत्र्यानंतर प्रथमच या प्रक्रियेत जातीय जनगणनेचाही समावेश करण्यात आला आहे. सामाजिक समरसता आणि न्यायाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
जनगणनेचा मुख्य उद्देश देशातील प्रत्येक व्यक्तीची गणना करून त्यासंबंधित सामाजिक आणि आर्थिक माहितीचे संकलन करणे हा आहे. या आकडेवारीच्या आधारे सरकार विविध धोरणे आणि विकासात्मक कार्यक्रमांची आखणी करते.
तज्ज्ञांच्या मते, जनगणनेचे यश केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून नसून नागरिकांच्या सक्रिय सहभागावरही तेवढेच अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या राष्ट्रीय उपक्रमात सहकार्य करणे आवश्यक आहे.
‘न्यू इंडिया समाचार’च्या 16 ते 31 मे 2026 च्या अंकामध्ये ‘जन-जनाची गणना – राष्ट्राची प्रगती’ हा विशेष विषय प्रकाशित करण्यात आला असून, जनगणना 2027 चे राष्ट्रीय महत्त्व त्यातून अधोरेखित करण्यात आले आहे.
🔴🟡🟠🔵
