कोयत्याच्या धाकावर दहशत माजवणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या; श्रीगोंदा पोलिसांची तत्पर कारवाई
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
श्रीगोंदा, दि. १९ जून
भारत प्रतिनिधी: नाहीद पठाण
शहरात कोयत्याचा धाक दाखवत नागरिकांना धमकावून मारहाण व जबरी चोरी करणाऱ्या मुख्य आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद केले आहे. पोलिसांच्या या तातडीच्या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन वायदंडे (रा. सराफे नगर, श्रीगोंदा) हे त्यांच्या पत्नीसाठी औषध आणण्यासाठी मेडिकलकडे जात असताना सिद्धार्थ नगर परिसरात पियुष बाळासाहेब घोडके (रा. सिद्धार्थ नगर, श्रीगोंदा) आणि त्याच्या एका अनोळखी साथीदाराने त्यांना अडवले. किरकोळ कारणावरून वाद घालत आरोपींनी फिर्यादीस मारहाण केली आणि त्यांच्या जवळील एक हजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली.
घटनेनंतर फिर्यादीची पत्नी रुपाली वायदंडे या आरोपीला जाब विचारण्यासाठी गेल्या असता, आरोपीने त्यांनाही अश्लील शिवीगाळ केली. तसेच हातातील धारदार कोयता दाखवत “जीवे ठार मारून टाकीन” अशी धमकी दिली. एवढेच नव्हे तर मोबाईलवर चित्रीकरण करून परिसरात दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत जबरी चोरी व धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवत मुख्य आरोपी पियुष घोडके याला अटक केली असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.
अहमदनगर जिल्हा पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलिसांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची पोलिसांची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
🔵🟠🟡🔴
