श्रीगोंदा पोलिस ठाण्यात एसीबीची धडक कारवाई; तीन पोलिस कर्मचारी लाच स्वीकारताना जेरबंद
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
श्रीगोंदा, दि. १८ जून
भारत प्रतिनिधी: नाहीद पठाण
श्रीगोंदा, दि. १८ जून : श्रीगोंदा पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. अपघाताच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी तीन पोलिस कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
माहितीनुसार, एका अपघाताशी संबंधित प्रकरणात तक्रारदाराकडून गुन्ह्याची नोंद करण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतल्यानंतर सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने तिन्ही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले.
या कारवाईत दादा म्हस्के, नितीन गाडे आणि राजेश जाधव या पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. एकाच वेळी तीन पोलिस कर्मचारी लाच घेताना पकडले जाण्याची श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील ही दुर्मिळ घटना मानली जात आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वीही श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील काही कर्मचारी लाचखोरीच्या प्रकरणात अडकले होते. त्यामुळे पोलिस दलाच्या प्रतिमेला पुन्हा धक्का बसला असून, विभागातील पारदर्शकता आणि शिस्तीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, एसीबीकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे श्रीगोंदा तालुक्यात संताप आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे.
🟠🔵🔴🟡
