फुलवाडी अंतर्गत शिवाची वाडी येथे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
२३ मे २०२६
विश्व निर्माता जालना प्रतिनिधी हरिचंद्र वाघमारे
परतुर तालुक्यातील फुलवाडी अंतर्गत शिवाची वाडी येथे दुपारी सुमारे ४:३० वाजण्याच्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गावातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बालासाहेब शामराव घनवट यांच्या शेतातील गट क्रमांक ६१ मध्ये लिंबाच्या झाडाखाली बांधलेल्या बैलावर वीज कोसळून बैल जागीच मृत्यूमुखी पडला. संबंधित घटनेची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
तसेच सुरेश सुखदेव वाघमारे रा. फुलवाडी यांच्या गट क्रमांक ११९ मधील शेतात बसविण्यात आलेले सोलार यंत्रणा वादळी वाऱ्यामुळे पूर्णपणे कोसळून नुकसान झाले आहे. संबंधित सोलार कंपनीने तातडीने पाहणी करून नुकसानग्रस्त सोलार बदलून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हनुमंत भागवत वाघमारे यांच्या केळी पिकांचेही वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे. या शेतकऱ्यांना शासनाकडून पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, एका दुर्दैवी घटनेत झाड कोसळून मीना हिराजी शेळके (वय ३६) व त्यांची मुलगी पूनम हिराजी शेळके (वय १५) गंभीर जखमी झाल्या आहेत. संबंधित घटनेची तलाठी, तहसीलदार व जिल्हाधिकारी यांनी तातडीने पाहणी करून जखमींना उपचारासाठी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
फुलवाडी गावात अतिवृष्टीमुळे अनेक झाडे उन्मळून पडली असून काही घरांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पोलही कोसळले आहेत. त्यामुळे गावातील वीजपुरवठा व दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांनी प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्तांना मदत करावी, अशी मागणी केली आहे.
