सारोळा सोमवंशी ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम : तीन मुलींचे २१ वर्षांपर्यंत शैक्षणिक पालकत्व स्वीकार
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
बुधवार ७ जानेवारी २०२६
जिल्हा प्रतिनिधी:- अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत ६ जानेवारी २०२६ रोजी प्रभावी आणि आदर्श उपक्रम राबविण्यात आला. सावित्रीबाई फुले जयंतीच्या शुभदिनी माननीय गटविकास अधिकारी श्रीगोंदा सौ. राणीताई फराटे यांच्या हस्ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तीन मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले.
ग्रामपंचायतीत “सावित्रीबाई फुले योजना” आखून या मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीच्या निधीतून प्रतिवर्षी एक हजार रुपये इतकी रक्कम थेट संबंधित मुलींच्या खात्यात जमा केली जाणार असून ही मदत सलग २१ वर्षे दिली जाणार आहे. भविष्यातील उच्च शिक्षणासाठी ही रक्कम मोलाची ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला असून या सामाजिक उपक्रमाचे गावात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
कार्यक्रमादरम्यान पत्रकार दिनानिमित्त पत्रकार श्री. दीपक वाघमारे, महेशकुमार शिंदे, अमोल बोरगे व प्रवीण कुमार शेंडगे यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत भवनात “आपले सरकार सेवा केंद्र”, वाचनालय व आर.ओ. फिल्टर यांचे उद्घाटन माननीय गटविकास अधिकारी व उपस्थित पत्रकार बांधव यांच्या हस्ते संपन्न झाले.
या संपूर्ण अभियानात गावाचे विद्यमान नेतृत्व श्री. राहुल आढाव यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमास सरपंच सौ. उज्वला राहुल आढाव, उपसरपंच श्री. संदीप ननवरे, ग्रामपंचायत सदस्य अंजाबापू कवाष्टे, सुप्रिया आढाव, शितल लोंढे, सविता नवले, मेहबूबी सय्यद, ग्रामपंचायत अधिकारी स्वप्निल आंबेटकर तसेच कर्मचारी भाऊसाहेब लोंढे, सूर्यकांत आढाव, गणेश आढाव आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील चेअरमन, सामाजिक कार्यकर्ते व महिला मंडळींची उत्स्फूर्त उपस्थिती लक्षणीय ठरली.
