श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक : नागरिकांचा प्रश्न — विकासाचे आश्वासन की पुन्हा ठप्प कामांची पुनरावृत्ती
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
बुधवार २६ नोव्हेंबर २०२५
शहर प्रतिनिधी, ऋषिकेश सांगळे: श्रीगोंदा शहरातील आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. अनेक वर्षांपासून अपूर्ण राहिलेली मूलभूत कामे, वारंवार बदलत जाणारी आश्वासने आणि निवडणूक येताना वाढणारी सक्रियता — या सर्व गोष्टींकडे पाहता शहरवासीय एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करत आहेत: “यावेळी खरोखर शहराचा विकास होणार की पुन्हा एकदा जुन्याच पद्धतीची पुनरावृत्ती?”
निवडणुकीत पुनरागमन करणारे परिचित चेहरे या निवडणुकीत उभे असलेले बहुतांश उमेदवार आधीही नगरपालिकेत कार्यरत होते. नागरिकांचा प्रश्न असा आहे की, “अनेक वर्षे शहराला विकासापासून वंचित ठेवणाऱ्या नेतृत्वाकडे पुन्हा बघायचे की नवे नेतृत्व शोधायचे?”
शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, प्रकाशयोजना आणि इतर मूलभूत सुविधांबाबत अनेक तक्रारी अद्याप शाबूत आहेत. साकळाई, डिंबे, माणिकडोह, कुकडी, तसेच अलीकडील MIDC पाणी योजनेविषयी नागरिक विचारतात, “या योजनांचा प्रत्यक्ष लाभ शहराला कितपत झाला?”
नागरिकांमध्ये वाढती जागरूकता
सध्या शहरातील सुज्ञ नागरिक भावनांना बळी न पडता वस्तुस्थितीचा विचार करून मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. निवडणूक जवळ येत असताना नागरिक म्हणतात की, शहराचा विकास हा निवडणुकीचा मुख्य मुद्दा असला पाहिजे. अपूर्ण कामे आणि दिवसागणिक वाढणाऱ्या अडचणी, शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था, वारंवार खोदकामामुळे वाढणारी गैरसोय, गल्लीबोळातील अंधार, अस्थिर पाणीपुरवठा — या समस्या नागरिक आजही अनुभवत आहेत. रस्ते खोदल्यानंतर त्यांच्या देखभालीसाठी मिळणारा निधी कसा वापरला गेला याबद्दलही लोकांमध्ये संभ्रम आहे.
नागरिकांची अपेक्षा श्रीगोंदा शहराला आज आवश्यक आहेत —
स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा
खड्डेमुक्त रस्ते
सक्षम वीजप्रणाली आणि पथदिवे
सर्व वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचणाऱ्या सुविधा
नागरिकांचे मत आहे की, आता निर्णय ठोस असायला हवा आणि येणाऱ्याने शहराच्या प्रगतीसाठी ठाम भूमिका घेणे अत्यावश्यक आहे.
“भविष्यासाठी योग्य मतदान करा” — नागरिकांचे आवाहन
शहरातील अनेक जागरूक नागरिकांचे मत आहे की, भावनेपेक्षा शहराच्या भल्याचा विचार करून निवडणूक निर्णय घ्यावा. “पुढील पिढीला चांगले शहर मिळावे, यासाठी जबाबदारीने मतदान करूया”, असे नागरिक सांगतात.
🔴🟢🟠🟣
