रोहिदास चौकातील भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास; नागरिकांकडून तातडीच्या उपाययोजनेची मागणी.
नागरिकांमध्ये भीतीचे सावट उपाय योजना का नाहीत ?
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
बुधवार २६ नोव्हेंबर २०२५
ऋषिकेश भास्कर सांगळे
शहर प्रीतिनिधी श्रीगोंदा
श्रीगोंदा │ शहरातील रोहिदास चौक परिसरातील नागरिकांनी भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाबाबत चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या भागात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्यामुळे लहान मुलं, महिला आणि वृद्ध नागरिक त्रस्त झाले असून काही किरकोळ अपघातांची नोंदही स्थानिक पातळीवर झाली आहे.
शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे पालक सांगतात. कुत्र्यांचे अचानक भुंकणे, वाहनांचा पाठलाग करणे आणि रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या परिसरात फिरत असल्यामुळे नागरिक अस्वस्थ आहेत.
स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही संबंधित विभागाकडे तक्रार नोंदवून तातडीने कारवाईची मागणी केली होती. मात्र समस्या अद्याप सुटलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
२ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, वार्ड क्र. ६ मधील रहिवाशांनी या प्रश्नावर एखाद्या ठोस व जबाबदार उपाययोजनेची अपेक्षा व्यक्त केली आहे. “भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर योग्य कृती करणाऱ्या उमेदवारालाच आम्ही प्राधान्य देऊ,” असे नागरिकांचे म्हणणे आहे.
गुलाबी थंडीचे वातावरण आणि निवडणुकीची चाहूल यामुळे शहरात चर्चा रंगत असताना, या महत्त्वाच्या स्थानिक प्रश्नावर कोणती ठोस भूमिका मांडली जाते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
सूचना
दिलेली माहिती अचूक व प्रतिनिधीच्या माहितीच्या आधारे घेतली जाते. बातमी मध्ये कसलीही त्रुटी असल्यास आम्हास संपर्क साधावा निर्माता प्रेस पोर्टल अहिल्यानगर
🔴🟢🟠🟣
