श्रीगोंद्यात १५ मार्च रोजी विराट हिंदू संमेलन; रामगिरीजी महाराज यांचे मार्गदर्शन
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार १२ मार्च २०२६
श्रीगोंदा (प्रतिनिधी) – श्रीगोंदा शहरात रविवार, दिनांक १५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता संत श्री शेख महंमद महाराज मंदिर प्रांगणात विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात श्री क्षेत्र सरला बेटचे महंत हभप रामगिरीजी महाराज (मनमाड, गोदावरी धाम) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती हिंदू संमेलन आयोजन समितीच्या वतीने देण्यात आली.
हिंदू समाजातील जातीभेद विसरून एकात्मता निर्माण करणे, हिंदू परंपरा, संस्कृती आणि मूल्यांचे संरक्षण व संवर्धन करणे तसेच देशभक्त व आदर्श नागरिक घडवून भारतमातेला वैभवाच्या शिखरावर नेण्याच्या उद्देशाने या विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील विविध घटकांमध्ये सामाजिक समरसता, राष्ट्रीय कर्तव्यभावना आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यावर या कार्यक्रमात विशेष भर देण्यात येणार आहे.
संमेलनाच्या निमित्ताने सायंकाळी ४ वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून ही शोभायात्रा कालकाई चौक येथील कालिका माता मंदिरापासून सुरू होऊन संत श्री शेख महंमद महाराज मंदिर प्रांगणात पोहोचणार आहे. पारंपरिक वाद्ये, टाळ-मृदुंग, लेझीम, आकर्षक देखावे आणि भक्तीमय वातावरणात ही शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
यानंतर मंदिर प्रांगणात मुख्य सभेचे आयोजन करण्यात येणार असून या सभेत महंत हभप रामगिरीजी महाराज यांचे मार्गदर्शन होणार आहे. कार्यक्रमास हभप भूषण महाराज महापुरुष यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून नाशिक विभागाचे बौद्धिक प्रमुख कृष्णाजी घरोटे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने माता-भगिनी, भाविक, वारकरी, तरुणाई आणि हिंदू समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदू संमेलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी हिंदू संमेलन समिती, श्रीगोंदा यांनी घेतली असून कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शहरातील विविध सामाजिक, धार्मिक व हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
🟣🔴🟢🟠
