बहुजन समता पार्टीचे श्रीगोंदा कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शनिवार, १४ मार्च २०२६
⚔️बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती⚔️
श्रीगोंदा : श्रीगोंदा येथे बहुजन समता पार्टीच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कर्जत तालुका कार्याध्यक्षपदी राघू जगधने तर कर्जत तालुका उपाध्यक्ष (कुळधरण भाग) पदी भाऊसाहेब जगताप यांची नियुक्ती करण्यात आली. बहुजन समता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव सकट यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.
दिल्ली येथे २३ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या मातंग आक्रोश मोर्चाच्या नियोजनासाठी ही बैठक घेण्यात आली होती. या मोर्चात सहभागी होण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले. २१ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता दौंड रेल्वे स्टेशन येथून दिल्लीकडे प्रस्थान करण्यात येणार असून सर्व पदाधिकाऱ्यांनी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत उपस्थित राहावे, असे आवाहन वसंतराव सकट यांनी केले.
यावेळी बोलताना वसंतराव सकट म्हणाले की, आरक्षण उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) या मागणीसाठी अनेक वर्षांपासून लढा दिला जात आहे. १ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरणाला मान्यता दिली असली तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. राज्य शासनाने अनंत पदर समितीची स्थापना करून सुरुवातीला तीन महिन्यांची मुदत दिली होती; मात्र अहवाल सादर न झाल्याने सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. या कालावधीत झालेल्या मेगा भरतीत मातंग समाजावर अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावे, एससी प्रवर्गातील समाजावर होणाऱ्या अत्याचारांवर कडक कारवाई व्हावी आणि ॲट्रॉसिटी कायदा अधिक बळकट करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांच्या स्मारकासह सांस्कृतिक भवन उभारण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
बैठकीदरम्यान कर्जत तालुक्यातील चळवळीतील कार्यकर्ते राघू जगधने यांना कार्याध्यक्षपदी नियुक्त करून बहुजन समता पार्टीचा बॅच व फेटा देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नांदगाव येथील भाऊसाहेब जगताप यांची कर्जत तालुका उपाध्यक्ष (कुळधरण भाग) पदी निवड करण्यात आली. बहुजन समता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्रजी सकटे यांनी दूरध्वनीद्वारे नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गायकवाड, कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड, जिल्हा संघटक मधुकर उकिरडे, जयश्री पवार, श्रीगोंदा शहराध्यक्ष अमोल ससाणे, तानाजी डाडर, चंद्रकांत डोलारे, दत्ताभाऊ घोडके, संजय शेलार, अॅड. राहुल शिंदे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन मधुकर उकिरडे यांनी मानले. नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून दिल्लीतील आंदोलन योग्य दिशेने असल्याचा सूर सर्वसामान्यांमधून उमटत आहे.
🟣🔴🟢🟠
