कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी श्रीगोंद्यात ट्रॅक्टर रॅली; काँग्रेसचा पाठिंबा
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
मंगळवार, ९ जून २०२६
श्रीगोंदा : सोमवार, दिनांक ८ जून रोजी दुपारी सुमारे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान श्रीगोंदा तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मुख्य विषय म्हणजे कांदा व इतर शेतीमालाला हमीभाव मिळावा आणि कांद्याचा दर निश्चित करून प्रति किलो किमान २५ रुपये भाव देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत असल्याने शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतमालाला योग्य बाजारभाव मिळवून द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दर्शविला. आंदोलनादरम्यान केंद्र व राज्य सरकारसमोर दोन प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. पहिली मागणी म्हणजे कांद्याला प्रति किलो २५ रुपये हमीभाव निश्चित करण्यात यावा आणि दुसरी मागणी म्हणजे कोणतीही अट न घालता सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी.
तसेच कांदा निर्यातीवरील निर्बंध टाळून शेतकऱ्यांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगला दर मिळवून देण्यासाठी शासनाने सकारात्मक धोरण अवलंबावे, अशीही मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
🟣🔴🟢🟠
