महाराष्ट्रात रेल्वे होणार फाटक मुक्त, रेल्वेच्या ६५ पायाभूत सुविधांच्या कामांना मान्यता
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
८ जून २०२६
मुख्य संपादक वैभव हराळ
मुबई : रेल्वेचा प्रवास सुरक्षित आणि गतिमान होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एकही रेल्वे मार्गावर फाटक राहता काम नये. महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (8 जून) येथे दिले.
महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत (महारेल) करण्यात येणाऱ्या एकूण १३१ पैकी पहिल्या टप्प्यातील 65 कामांना फडणवीस यांनी सोमवारी मान्यता दिली. दरम्यान, या कामांसाठी हुडकोकडून कर्ज उपलब्ध करून घ्यावे आणि महारेलमार्फत पूर्ण करण्यात आलेल्या कामांचे देयक राज्य सरकारकडून तातडीने अदा करण्यात यावीत, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सह्याद्री अतिथिगृह येथे ‘महारेल’ची आढावा बैठक झाली. राज्यातील सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाण पूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालील (अंडर पास) रस्त्याची कामे महारेलमार्फत करण्यात येणार आहेत. याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्याचवेळी रेल्वे फाटक मुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या. महानगरांमध्ये रेल्वे मार्गाच्या आजूबाजूला असलेले वाढते शहरीकरण लक्षात घेता अशा भागात गरजेनुसार नागरिकांच्या सुलभ दळणवळणासाठी पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात यावीत. मान्यता देण्यात आलेल्या 65 कामांमधील संबंधित रस्त्यांवरील २५ हजार ते १ लाखापर्यंत ‘टीव्हीयू’ (ट्रेन व्हेईकल युनिट) असलेल्या आणि कमीत कमी भूसंपादन आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत, असे फडणवीस यांनी सांगितले.
पायाभूत सुविधांसाठी आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची समिती वाढते शहरीकरण लक्षात घेता शहरांमधील ८० रेल्वे पायाभूत सुविधांची कामे नियोजित करण्यात आली आहे. या कामांसाठी संबंधित महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची समिती स्थापन करण्यात यावी. समितीने नियोजित कामाविषयी पडताळणी करावी. त्यानंतर ते काम महारेल हाती घेईल, असे निर्देश देतानाच ही कामे पूर्ण झाल्यास या भागातील नागरिकांना त्यांच्या मागणीआधीच पायाभूत सुविधा मिळतील, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
🟣🔴🟢🟠
