बहुजन समता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष मातंग आक्रोश मोर्चासाठी दिल्लीकडे सज्ज
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
श्रीगोंदा | दिनांक : २० मार्च २०२६
श्रीगोंदा : बहुजन समता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव सकट हे आपल्या पदाधिकाऱ्यांसह मातंग समाजाच्या आक्रोश मोर्चासाठी दिल्लीकडे रवाना होण्यासाठी सज्ज झाले आहेत. प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे (संस्थापक अध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा २३ मार्च २०२६ रोजी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.
या मोर्चामध्ये अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) तातडीने मंजूर करावे, अशी प्रमुख मागणी करण्यात येणार आहे. तसेच लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा, तसेच अत्याचार प्रतिबंधक (अॅट्रॉसिटी) कायदा अधिक कठोर करण्यात यावा, अशाही मागण्या मांडण्यात येणार आहेत.
बोधेगाव येथे अण्णाभाऊ साठे यांच्या हस्ते अमर शेख उपस्थित राहिले होते. त्यावेळी दोघांचेही स्वप्न होते की, त्या ठिकाणी एक भव्य सांस्कृतिक भवन उभारले जावे. मात्र, मित्राच्या दुःखातून सावरण्याआधीच अमर शेख यांचे निधन झाले. त्यामुळे त्या जागेवर अमर शेख व अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक तसेच सांस्कृतिक भवन उभारण्याचीही मागणी या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी या मोर्चाचे आयोजन केले असून, राज्यभरातून पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. वसंतराव सकट हे देखील आपल्या सहकाऱ्यांसह या मोर्चात सक्रिय सहभाग नोंदवणार असल्याची माहिती मिळाली आहे.
🟣🔴🟢🟠
