शिरूरमध्ये गोरगरीब रुग्णांकडे आयुष्यमान कार्ड असूनही शासकीय योजनांपासून वंचित करून आर्थिक लुटमारीचा गंभीर प्रकार.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शुक्रवार २६ डिसेंबर २०२५
अपघातग्रस्तांना मोफत उपचार नाकारल्याचा आरोप; शिरूरमधील रुबी हॉल हॉस्पिटल मध्ये भ्रष्टाचाराचा गंभीर प्रकार.
शासकीय आयुष्यमान भारत योजना तसेच महाराष्ट्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कार्ड असूनही अपघातग्रस्त रुग्णांना मोफत उपचार नाकारून बळजबरीने हजारो रुपये आकारण्यात आल्याचा गंभीर प्रकार शिरूर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे व पत्रकार अमोल बोरगे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे लेखी तक्रार केली.
रुबी हॉल हॉस्पिटल प्रशासन अधिकाऱ्याने कान धरून उठाबशा काढून मागितली माफी.
ढवळगाव (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथील श्री. सयाजी तबाजी आडगळे व सौ. सारिका सयाजी आडगळे यांना शुक्रवार, दि. 19 डिसेंबर 2025 रोजी ट्रॅक्टरने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून श्री. सयाजी आडगळे यांच्या डोक्याला जबर मार लागून 19 टाके घालावे लागले.
जखमी रुग्णांना शिरूर येथील रसिकलाल माणिकचंद धारीवाल फाउंडेशन संचलित मातोश्री मदनबाई धारीवाल हॉस्पिटल तसेच संलग्न ग्रँट मेडिकल फाउंडेशन – रुबी हॉल क्लिनिक, शिरूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने दोन्ही रुग्णांचे मिळून सुमारे 70 हजार रुपयांचे बिल आकारल्याचा गंभीर प्रकार केला.
विशेष म्हणजे, संबंधित कुटुंबाकडे आयुष्यमान भारत कार्ड आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कार्ड असूनही “कार्ड चालत नाही” व “या कार्डावर उपचार होणार नाहीत” असे सांगून मोफत उपचार नाकारण्यात आल्याचा आरोप आहे. याशिवाय बिलामधील काही रक्कम रोख स्वरूपात वसूल करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
हे कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे असून अनुसूचित जातीतील मागासवर्गीय आहे. शासनाच्या अपघात व आरोग्य योजनांचा लाभ मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असताना रुग्णालयांकडून शासनाच्या धोरणांचे उल्लंघन झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून आकारलेली रक्कम परत मिळवून द्यावी, दोषी रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी तसेच आवश्यक असल्यास शासकीय मान्यता रद्द करावी, अशी ठाम मागणी मुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्यात येणार आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे, सागर घोलप, संदीप कडेकर, फिरोज सय्यद, अशोक गुळादे सह माजी नगरसेवक विनोद भालेराव, माजी नगरसेवक दादाभाऊ लोखंडे यांनी रुग्णालय व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता बिलामध्ये तफावत असल्याचे समोर आले. औषधांच्या किमती बाहेरील मेडिकल व रुग्णालयातील मेडिकलमध्ये अनेक पटीने वाढवून लावत असल्याचे निदर्शनास आले.
सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर रुग्णालयाचे मुख्य प्रशासक मायकल पॉल यांनी नाथाभाऊ पाचर्णे यांना अरेरावीची भाषा व धक्काबुक्की करण्याचा प्रकार केला. त्यामुळे पोलीस प्रशासनाला सुद्धा पाचारण करण्यात आले. परंतु नाथाभाऊ पाचरणे यांनी वास्तविक औषधांचे जाणीवपूर्वक वाढवून लावलेले दर तसेच सदर रुग्ण शासकीय योजनेमध्ये बसत असल्याचे स्पष्टपणे दाखवून दिल्याने या हॉस्पिटल प्रशासनाला अक्षरशा कान धरून हॉस्पिटल कर्मचारी व रुग्णांसमोर उठाबशा काढण्याची व माफी मागण्याची वेळ आली.तसेच याबाबत रुग्णालयाचे व्यवस्थापन अधिकारी मायकेल पॉल यांनी मुख्य शाखेशी चर्चा करून पुढील काळात औषधांचे दर व डॉक्टरांच्या तपासणी शुल्कात कपात करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
तसेच रुग्णालयाच्या दर्शनी भागात धर्मदाय आयुक्त अंतर्गत असल्याचा उल्लेख, मोफत उपचारांची यादी व दर स्पष्टपणे लावावेत, अशी मागणीही यावेळी नाथाभाऊ पाचर्णे यांनी केली. या घटनेमुळे शासकीय आरोग्य योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती ढिसाळ आहे, यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून शासनाची पुढील भूमिका काय असते, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
🔴🟢🟠🟣
