श्रीगोंद्यात जप्त गुटख्याच्या गोण्यांवर आढळला जुन्या गुन्ह्याचा सीआर क्रमांक; चौकशीची मागणी
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
श्रीगोंदा, दि. १५ जून २०२६
भारत प्रतिनिधी : नाहीद पठाण
श्रीगोंदा शहरातील पेडगाव रस्ता परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात सुगंधी गुटखा जप्त करण्यात आला. मात्र या कारवाईनंतर समोर आलेल्या एका बाबीमुळे पोलीस विभागात चर्चेला उधाण आले आहे.
जप्त करण्यात आलेल्या गुटख्याच्या काही गोण्यांवर पोलीस विभागाचा गुन्हा नोंद क्रमांक (सीआर नंबर) असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा मुद्देमाल यापूर्वीही एखाद्या पोलीस कारवाईत जप्त करण्यात आला होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अवैध व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. छाप्यामध्ये विविध कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात गुटखा सापडल्याने पोलिसांनी तो ताब्यात घेत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.
मात्र जप्त मुद्देमालावरील सीआर क्रमांकामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. सामान्यतः जप्त केलेल्या मालावर संबंधित गुन्ह्याची नोंद असते. अशा परिस्थितीत हा माल यापूर्वी जप्त करण्यात आला होता का, तसे असल्यास तो पुन्हा बाजारात कसा पोहोचला, याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
या संदर्भात जप्त मालाची नोंद, पंचनामे, मालखाना रजिस्टर तसेच संबंधित गुन्ह्याची कागदपत्रे तपासण्याची मागणी होत आहे. या तपासणीतूनच वस्तुस्थिती समोर येऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे संकेत पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. चौकशीअंतीच जप्त गुटखा आणि त्यावरील सीआर क्रमांक यामागील नेमके वास्तव स्पष्ट होणार आहे.
🔵🟠🟡🔴
