💥अजित पवार यांना श्रद्धांजलीपर अग्नीपंखचा प्रेरणादायी उपक्रम…💥
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शुक्रवार २० फेब्रुवारी २०२६
💥चिमुकल्यांच्या दातृत्वातून उभारली १५ मे. टन धान्य बँक💥
श्रीगोंदा माधव बनसुडे :-राजकारण हा धर्म आणि राज्याचा विकास हेच कर्म मानून महाराष्ट्राच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून अग्निपंख फाउंडेशन तर्फे “एक मुठ धान्य अनाथांसाठी” हा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या हृदयस्पर्शी दातृत्वातून तब्बल १५ मेट्रिक टन धान्याची बँक उभी राहिली असून हे धान्य १७ वसतिगृहांना शिदोरी स्वरूपात वितरित करण्यात येणार आहे.
दि. १० ते १६ फेब्रुवारी दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील ६१ शाळा-विद्यालयांमध्ये हा उपक्रम उत्स्फूर्तपणे राबविण्यात आला. धान्य संकलनाचा शुभारंभ येळपणे येथे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते झाला. वांगदरी येथे नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, श्रीगोंद्यात तहसीलदार सचिन डोंगरे, नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस, उपनगराध्यक्षा अलका अनभुले, माजी नगराध्यक्षा शुभांगी पोटे, उद्योजक प्रशांत बोत्रे पाटील, गटशिक्षणाधिकारी कुसुमकुमारी कानडी यांच्या उपस्थितीत संकलन करण्यात आले.
घोगरगाव येथे बाबासाहेब भोस, बेलवंडी येथे आण्णासाहेब शेलार, कोळगाव येथे डॉ. प्रणोती जगताप, इनामगाव येथे उद्योजक प्रकाश कुतवळ तर बाबुर्डी येथे गटविकास अधिकारी राणी फराटे यांच्या हस्ते उपक्रम पार पडला.
बुधवारी देवदैठण येथील विद्याधाम प्रशालेत खासदार निलेश लंके यांच्या हस्ते धान्य संकलनाची सांगता करण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून राबविलेल्या या उपक्रमातून माणुसकीचे दर्शन घडले. श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता सामाजिक जाणीव जपणारे दातृत्व दाखवले, हे प्रेरणादायी आहे.”
प्रास्ताविक अग्नीपंख फौंडेशनचे कार्याध्यक्ष प्रा. संजय लाकूडझोडे यांनी केले. प्राचार्य विशाल डाके व संतोष इथापे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुरेश लोखंडे, सुभाष वाघमारे, सचिन गव्हाणे, नवनाथ दरेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप घावटे यांनी केले.
🔴🟢🟠🟣
